उपसंपादक : सतीश मिरपगार
पाथर्डी नगर परिषदेच्या वतीने उभारलेले नवीन पथदिवे अनेक ठिकाणी बंद पडले असून, शहरातील अंधार दूर करण्यासाठी तातडीने चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन दिनकर यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक दोनमधील रामगिरी बाबा टेकडी आणि हरिजन वस्ती परिसरात विशेष योजनेअंतर्गत उभारलेले पथदिवे बंद असल्याने अंधार पसरला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या असूनही ठेकेदाराला सूचना देण्यात आलेली नाही. निकृष्ट दर्जाचे हे काम असल्याची खंत व्यक्त करत, परिसरातील नागरिकांनी दर्जेदार सुधारणा आणि अंदाजपत्रकाप्रमाणे काम करण्याची मागणी केली आहे. अंधारामुळे भुरट्या चोऱ्या आणि भटके जनावरे वाढली असून, नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे.याशिवाय, नवीन भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजनांमुळे चांगले रस्ते फोडले गेले आहेत. ते किमान खड्डे बुजून पूर्वरत करण्याची मागणी आहे. धुळीमुळे अपघात वाढले आहेत.
थकबाकी भरूनही नळजोडणी मिळत नाही आणि जुन्या नळांना पाणी येत नाही, यामुळे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत.या सर्व समस्यांचा तातडीने निपटारा व्हावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
