प्रतिनिधी सचिन दिनकर
पाथर्डी : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते असून राष्ट्रीय राजकारणात दलित व मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी भक्कम भूमिका मांडली आहे.

मात्र पाथर्डी नगर परिषद निवडणूक २०२५ च्या भाजपा प्रचार पत्रिका, बॅनर आणि होर्डिंग्जवर त्यांचा एकही फोटो नसणे तसेच प्रचारात त्यांच्या नावाचा उल्लेख न होणे हा सरळसरळ दुराभिमानाचा आणि दुर्लक्षाचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार आकाश काळोखे यांनी केला आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आकाश काळोखे म्हणतात, “रामदास आठवले यांचा अपमान हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तर त्यांनी ज्या विचारांचे व समाजाचे प्रतिनिधित्व केले त्या संपूर्ण समाजाचा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु असा अपमानजनक आणि अशोभनीय व्यवहार सभ्य समाजात कधीही स्वीकारार्ह नाही. या कृतीतून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न दिसून येतो.”काळोखे यांनी भाजपावर टीका करताना म्हटले की, “भारतीय जनता पार्टीचे आठवलेप्रेम हे संधीसाधूपणाचे आहे. त्यांच्या शब्दांत, ‘हे प्रेम पुतना मावशीसारखे असून गरज संपली की पाठ फिरवण्याची भाजपाची प्रवृत्ती पुन्हा एकदा दिसून आली.’ दलित व मागासवर्गीय समाजासाठी सातत्याने लढा देणाऱ्या नेत्याचा प्रचारातून जाणीवपूर्वक बहिष्कार – हा त्यांच्या कार्याचा अवमान असून भाजपा केवळ या समाजाला वोट बँक म्हणून पाहत असल्याचे स्पष्ट होते.”काळोखे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारामुळे दलित व मागासवर्गीय समाजात नाराजीची लाट असून नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर बहिष्कार टाकण्याची भूमिका मोठ्या प्रमाणावर आकार घेत आहे. रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय, सक्षमीकरण आणि मागासवर्गीय समाजासाठी केलेले योगदान नाकारण्याचा प्रयत्न करणे हा मोठा राजकीय दुराग्रह असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रकरणामुळे पाथर्डीच्या राजकारणात नवा वादंग निर्माण झाला असून निवडणूक प्रचाराची दिशा अधिक आक्रमक झाली आहे.
