प्रतिनिधी – सचिन दिनकर
अहिल्यानगर : नवनाथ वाव्हळ यांच्या इतिहास संशोधनामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा विस्मृतीत गेलेला इतिहास उजेडात आला असल्याचे प्रतिपादन स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे यांनी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. हा भव्य सोहळा माऊली संकुल सभागृहात नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समाजसेवक यादवराव पावसे होते. तसेच श्री. बाबासाहेब पावशे, श्री. रोहित पवार यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील सरपंच सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील कला, इतिहास, संस्कृती, साहित्य, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याकडून करण्यात येतो.
या प्रसंगी बोलताना यादवराव पावसे म्हणाले की, “सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो. गावाचा विकास त्याच्या प्रयत्नातूनच घडतो. त्यामुळे सरपंचांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून निर्णय घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. गेल्या आठ वर्षांपासून सरपंच सेवा संघ विविध क्षेत्रातील दिग्गजांना सन्मानित करून त्यांना कार्यप्रवणतेची प्रेरणा देत आहे.”
याच कार्यक्रमात न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथील प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ यांना ‘राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. वाव्हळ यांनी गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्याच्या कडेकपाऱ्यांमध्ये, वाड्यावस्त्यांमध्ये, गावागावांमध्ये भ्रमंती करत स्थानिक इतिहासाचा संदर्भासहित अभ्यास केला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, वस्तुनिष्ठता आणि चिकित्सक दृष्टिकोनातून जिल्ह्याचा इतिहास साकारला असून त्यांच्या संशोधनामुळे अहिल्यानगरचा गौरवशाली भूतकाळ प्रकाशात आला आहे.
ते केवळ वर्गात अध्यापन करणारे प्राध्यापक नसून, समाजासाठी कार्य करणारे इतिहास संशोधक आहेत. त्यांच्या ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांबरोबरच समाजालाही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पावसे यांनी नमूद केले.
स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य पुरस्कार समितीने त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेत त्यांची ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी निवड केली. या सन्मानामुळे प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ यांचे जिल्हाभर कौतुक होत असून, त्यांच्या संशोधन कार्याला नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
