प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी : गोमातेला राज्य मातेचा दर्जा मिळाल्यानंतरही तिसगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोहत्या थांबवण्यात अपयश आले असतानाच, पाथर्डी पोलिस आणि स्थानिक गोरक्षकांच्या तत्परतेमुळे ऐन सणासुदीच्या काळात सात गोवंश कत्तलीपासून वाचवण्यात यश आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पाथर्डी पोलिस स्टेशनचे पीएसआय संदीप ढाकणे, तसेच सुखदेव धोत्रे, अक्षय वडते, कानिफनाथ गोफणे, दुर्योधन मस्के आणि मानद पशुकल्याण अधिकारी चांगदेव भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली तिसगाव येथे छापा टाकण्यात आला. वृद्धेश्वर हायस्कूलच्या मागील फॉरेस्ट विभागाच्या जागेत सात ते आठ गोवंश गेल्या सहा-सात दिवसांपासून अत्यंत अमानुष अवस्थेत, चारा-पाण्याविना, उन्हात-वार्यात बांधून ठेवल्याचे आढळून आले.या छाप्यात सहा जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी कासार पिंपळगाव येथे तिसगाव येथील खाटीक एका ठिकाणी गोमांस विक्री करताना आढळून आला. केवळ २४ तासांच्या अवधीत दोन ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिस आणि गोरक्षक यांच्यातील समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे.कर्तव्यदक्ष पोलिसांनी सणावाराची पर्वा न करता गोरक्षणासाठी तत्परतेने कारवाई केल्याने सर्व स्तरातून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. गोरक्षा व गोसेवा संघ, पाथर्डी यांच्या वतीने या सर्व पोलिसांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी पोलिस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले की, “गोमातेची हत्या, खरेदी-विक्री किंवा वाहतूक कुठेही होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. गोहत्या रोखण्यासाठी निश्चितच कठोर कारवाई करण्यात येईल.
”या मोहिमेत गोरक्षक मुकुंद भाऊ गर्जे, सोमनाथ बंग, सारंग मंत्री, आशुतोष शर्मा, ज्ञानेश्वर सातपुते, विशाल शिंदे, भैया नागरे, गुरु पाठक, जयदेव शिरसाठ, समर्थ रोडी, गोविंद रावस, भाऊ तुपे आणि निलेश इजारे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.गोरक्षक व पोलिसांच्या जागरूकतेमुळे सणासुदीत एक गंभीर गुन्हा रोखण्यात यश आला आहे.
