February 21, 2026

पाथर्डी शहरातील जुना खेर्डा रस्ता, खंडोबा माळजवळील एका कॉलनीत नुकतेच आठ दिवसांपूर्वी ठेकेदारामार्फत काँक्रीटिंगचे काम करण्यात आले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यावर पडलेली खडी तसेच उरलेले बांधकाम साहित्य तसचे तस राहिले.

आठ दिवस उलटून गेले तरीही नगरपालिकेकडून या खडीची सफाई करण्याची तसदीही घेतली गेली नाही. परिणामी या ठिकाणी दररोज अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात घडत होते. काही दुचाकीस्वार तर जखमीही झाले आहेत.नागरिकांनी या संदर्भात वारंवार पालिकेच्या अभियंता विभागाशी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला, तोंडी तक्रारी दिल्या, परंतु पालिका प्रशासनाने नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केले. सार्वजनिक सुरक्षिततेकडे आणि नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणाऱ्या या उदासीन वृत्तीबद्दल परिसरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अखेर आज दिवाळीच्या सकाळी, सकाळी आठ वाजता नागरिकांनी स्वतःच झाडू व फावडे हातात घेत रस्त्यावर पडलेली खडी बाजूला केली आणि रस्ता स्वच्छ करून वाहतुकीसाठी सुरक्षित केला. प्रशासनाच्या निष्क्रियतेला उत्तर म्हणून नागरिकांनी केलेले हे काम सर्वांसाठी एक धडा ठरावा, अशी भावना स्थानिकांतून व्यक्त होत आहे.नागरिकांनी स्पष्ट मागणी केली आहे की, या ठिकाणी काँक्रीटिंगचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल देऊ नये, कारण काम पूर्ण झाल्यानंतर योग्य स्वच्छतेची जबाबदारी पार पाडलेली नाही. तसेच या भागाचे देखरेख करणारे अभियंते आणि संबंधित कर्मचारी यांनी नागरिकांच्या वारंवार तक्रारींनंतरही कोणतीही दखल घेतली नाही.

या परिसरातील अनेक पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असून, रात्रीच्या वेळी परिसर अंधारात बुडतो आहे. या समस्येकडेही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर पालिकेने या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर दिवाळी उत्सव संपताच पालिकेच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्यास ते भाग पडतील.नागरिकांची भावना स्पष्ट आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!