प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी – आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकी हरवतेय असं वाटत असतानाच पाथर्डी पोलिसांनी दिलासा देणारा, अंतःकरण हलवणारा आदर्श उभा केला आहे.

पोलिस निरीक्षक विलास पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता पाहून प्रत्येकाचे मन भारावून गेले आहे.शेवगाव रोडवर दोन ते तीन महिन्यांपासून एक मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडून होती. असहाय, अशक्त, भुकेला आणि पूर्णपणे उपेक्षित.

रोज असंख्य लोक येत-जगत त्या माणसाच्या शेजारून गेले — पण कोणी थांबले नाही, कोणी विचारले नाही. मात्र निरीक्षक विलास पुजारी यांनी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना केवळ ‘बेवारस माणूस’ दिसला नाही, तर ‘मदतीची गरज असलेला जीव’ दिसला.क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मानवतेचा हात पुढे केला. स्वतः रिक्षा बोलावून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला जवळच्या प्रेशर पंपावर नेण्यात आले. तेथे पुजारी साहेबांनी स्वतःच्या हाताने त्याला अंघोळ घालून स्वच्छ कपडे परिधान करून दिले. माती, धूळ आणि दुःखाने झाकलेले ते चेहरे जेव्हा स्वच्छ झाले, तेव्हा फक्त शरीर नव्हे — त्या माणसाच्या आत्म्यालाही पुन्हा सन्मानाचा स्पर्श झाला.

या भावनिक कार्यात उपनिरीक्षक विलास जाधव, अमोल आव्हाड, अक्षय वडते, हवालदार मधुकर कोकाटे, ज्ञानेश्वर खाडे, तसेच मोहटादेवी देवस्थानचे सदस्य आणि नगरपरिषदेचे कर्मचारी — रशीद शेख, अंबादास दिनकर, गणेश दिनकर, रवींद्र दिनकर — यांनी मनापासून साथ दिली.यानंतर पोलिस आणि नगरपरिषदेच्या संयुक्त प्रयत्नातून त्या व्यक्तीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण पाथर्डी शहरभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर “हीच खरी पोलीस माणुसकी!” असा उद्गार सर्वत्र झळकत आहे.या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले — वर्दी फक्त कायदा पाळण्यासाठी नसते, ती कधी कधी माणुसकीचा हात देण्यासाठीही असते.
