प्रतिनिधी – सचिन दिनकर
कल्याण–निर्मळ राष्ट्रीय महामार्ग / प्रतिनिधी – करंजी घाटातील धोकादायक वळणावर शनिवारी पहाटे सुप्याहून बीडकडे जात असलेल्या ट्रकचा अपघात झाला.

या अपघातात ट्रकमधील २५ टन लाकूड रस्त्यावर पडले, तसेच ट्रकही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.चार दिवसांपूर्वी याच घाटावर पुण्याहून नांदेडकडे जात असलेल्या कंटेनरचा अपघात झाला होता. त्या अपघातात सहा नवीन ट्रॅक्टर ५० फूट खोल दरीत पडले, आणि कंटेनरसह ट्रॅक्टरचे देखील मोठे नुकसान झाले होते.

वारंवार या वळणावर दोन-चार दिवसाला जड वाहनांचे अपघात होत असून, राष्ट्रीय महामार्ग विभाग अद्याप बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. या घाटातील रस्त्याचे रुंदीकरण आणि धोकादायक वळणांची दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
अपघातांमुळे करंजी घाटावरील ट्रॅफिक जाम होत असून, जड वाहनांचे चालक येथे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. त्यामुळे धोकादायक वळण दुरुस्त करून रस्त्याचे रुंदीकरण करणे तातडीचे असल्याचे नागरिक आणि वाहतूक तज्ज्ञ सांगत आहेत.
