प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी तालुक्यातील पूर परिस्थितीचा धक्का अजूनही नागरिकांनी पूर्णपणे सावरलेला नाही, त्यातच मोबाईल सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, यामुळे प्रशासन, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

या काळात बीएसएनएलच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आपले फोन फॉरवर्ड करून ठेवले असून, दिलेले संपर्क क्रमांक एकतर लागत नाहीत किंवा लागले तर उचलले जात नाहीत. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि सेवा सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नागरिकांना मिळत नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, बीएसएनएलच्या जुनाट यंत्रसामुग्री व देखभालीकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. केबल तुटल्याचे कारण देण्यात येत असले, तरी केबल कोठे तुटली याची तांत्रिक माहिती अधिकाऱ्यांना त्वरित मिळते. मात्र, दुरुस्तीसाठी दोन दोन दिवसांचा अवधी लागतो आणि ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही खाजगी कंपन्यांसह बीएसएनएलकडूनही अशा प्रकारचे निष्काळजीपणाचे प्रकार सुरू असल्याची टीका केली जात आहे. पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून शासन आणि प्रशासन एका बाजूने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, आवश्यक दळणवळणाची सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रशासन, कार्यकर्ते आणि मोबाईल ग्राहकांनी हात टेकले आहेत. दरवेळी वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी स्थानिक कार्यालयात जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. बीएसएनएलचा सर्व कारभार स्वतंत्रपणे चालतो, आम्हालाच इथली माहिती मिळत नाही, अशी उत्तरे पूर्वी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. सेवा ठप्प असल्याने अनेक नेटवर्क विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील मोबाईल धारकांना संपर्क साधणे अशक्य झाले आहे. विशेषतः पाथर्डी शहरात तर कोणतीही मोबाईल सेवा नीट उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. या गंभीर परिस्थितीबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड म्हणाले की, पाथर्डी शहरासह संपूर्ण तालुक्यातील मोबाईल सेवा तातडीने सुरू झाली नाही, तर ग्राहकांचे तीव्र आंदोलन उभे करून संबंधित यंत्रणेला जाब विचारला जाईल. तसेच नैसर्गिक आपत्ती कायद्यान्वये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पूरग्रस्तांच्या भावना लक्षात घेऊन दळणवळणाची सेवा लवकरात लवकर सुरळीत करावी, अशी सर्वसामान्यांची जोरदार मागणी आहे.
