February 20, 2026

पाथर्डी_येत्या सोमवारी सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे आज शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.

पंचायत समिती बांधकाम विभाग आणि देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कारवाईमुळे गड परिसरातील रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला असून, उत्सव काळात कितीही गर्दी झाली तरी वाहतुकीत अडथळा येणार नाही.

तणावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मोहिमेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यापूर्वी बांधकाम विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना आठ दिवसांपूर्वी लेखी नोटीस देऊन अतिक्रमणे स्वखर्चाने हटविण्याची सूचना केली होती. मात्र व्यवसायिकांनी ती दखल न घेतल्याने आज सकाळी बांधकाम विभाग प्रमुख राम राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान संबंधित व्यावसायिकांनी “नवरात्र काळापुरते दुकाने लावू द्या, नंतर आम्ही स्वतः अतिक्रमणे काढून टाकू” अशी विनंती केली होती, मात्र प्रशासनाने वाहतुकीची सुरक्षा लक्षात घेऊन कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला नाही. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत ५० हून अधिक अतिक्रमणे हटवून संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला.या कारवाईत कनिष्ठ अभियंते संदीप खेडकर, प्रतीक कराळे, अर्जुन पठाडे, कीर्तन गटकळ, सुदाम खेडकर, अशोक बोराडे, सुधीर खेडकर, उत्तम दाणी, सुभाष केदार यांच्यासह विविध कर्मचारी सहभागी झाले होते.नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले असून, पुढील काही दिवसांत पाथर्डी शहरातील चिंचपूर रोड व कोरडगाव रोडवरील अतिक्रमणांवरही अशीच संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!