February 21, 2026

पाथर्डी_राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे पाथर्डी-नगर मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसह नवरात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी कोरडगाव रोडकडील एसटी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ महामार्गाच्या काँक्रीट नालीला मोठा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यात पुणे-बीड शिवाई बस अडकून जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. बसचे नुकसान झाले असून, प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला.घडलेल्या घटनेनंतर खड्ड्यात थोड्याफार माती व कचरा टाकून तात्पुरते बुजविण्यात आले, मात्र हलक्या पावसाने ही माती चिखलात बदलून पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

याचा फटका बसच नव्हे तर छोट्या-मोठ्या वाहनांना सतत बसत असून, काल सायंकाळी कल्याण-पाथर्डी एसटी बसही त्याच खड्ड्यात अडकली आणि पुन्हा वाहतूक ठप्प झाली.

नवरात्रोत्सवासाठी नगर ते मोहटादेवी या मार्गावर लाखो भाविक पायी यात्रा करतात. टोल नाक्याजवळील डायव्हर्शन भाग आणि मेहेकरी फाट्यावरील पुलाजवळही मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे. “आता या रस्त्यावरून कसे जावे?” अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागातून येणारी वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. नवरात्र उत्सव शांतता समितीच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभागाने एसटी आगाराच्या गेट क्रमांक तीन पुढील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या उपस्थितीत आदेशही देण्यात आले, मात्र प्रत्यक्ष काम ढिसाळ असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी सांडपाणी उघडे सोडण्यात आले असून नगरपालिकेच्या लिकेजमुळे पायी जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडते. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नवरात्रोत्सवाच्या तोंडावर भाविकांचा संताप वाढला आहे. “यात्रेच्या नियोजनात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर यात्रा नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करावी,” अशी मागणी यात्रा समितीने केली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!