देशभरात गेल्या काही दिवसांपासून टीईटी अर्थात टीचर एलिजिबिलिटी टेस्टची जोरदार चर्चा सुरू आहे. शालेय शिक्षण विभागाने २०१३ नंतर रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य केली होती.

मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या आदेशामुळे २०१३ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांचीही झोप उडाली आहे.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे की, ३ सप्टेंबर २००१ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक राहणार नाही. त्याचप्रमाणे ३ सप्टेंबर २००१ ते २९ जुलै २०११ या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही काही प्रमाणात सूट मिळणार आहे. पण इथेच खरी अडचण दडलेली आहे. कारण या काळात रुजू झालेले आणि ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा अधिक बाकी आहे अशा शिक्षकांना अनिवार्यपणे टीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांनी ही परीक्षा दिली नाही तर त्यांना सक्तीची सेवा निवृत्ती देण्याचा मार्ग मोकळा राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी आहे अशा शिक्षकांना टीईटी न देण्याची मुभा असेल, मात्र त्यांनाही पदोन्नतीसाठी ही परीक्षा द्यावी लागणार आहे. याशिवाय २९ जुलै २०११ नंतर सेवेत आलेल्या सर्वच शिक्षकांना बंधनकारकपणे टीईटी देणे आवश्यक आहे. म्हणजे आता कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांना या परीक्षेपासून पळवाट मिळणार नाही.
या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल २२ हजार शिक्षकांवर संकट ओढवलं आहे. त्यापैकी जवळपास १५ ते १७ हजार शिक्षकांची पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा उरलेली आहे. यात अनेक शिक्षक आधीपासूनच टीईटी धारक आहेत, मात्र जे अजूनही परीक्षा पास झालेले नाहीत, त्यांचं करिअर धोक्यात आलं आहे. विशेषतः अनुकंपा तत्त्वावर सेवेत लागलेले अनेक शिक्षक या आदेशामुळे अडचणीत येणार असल्याचं चित्र आहे.
शिक्षक समाजात या निर्णयामुळे प्रचंड संभ्रम आणि भीतीचं वातावरण आहे. कारण ज्यांनी दशभर शिक्षण क्षेत्रात काम केलं, त्यांना आता पुन्हा एकदा कठीण स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. परीक्षा पास न झाल्यास थेट नोकरीवर गदा येईल ही भीती त्यांच्या मनात घर करून बसली आहे.
थोडक्यात, सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाने २०१३ नंतरच्या नव्या शिक्षकांप्रमाणेच आता २०१३ पूर्वीचे शिक्षकही टीईटीच्या कचाट्यात आले आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील शिक्षकांमध्ये या निर्णयाबाबत प्रचंड चर्चा रंगली आहे.
