April 18, 2026

अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीचा थरारक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या ग्रामसेवकाला थेट बंदुकीच्या नळीवर ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकाराने ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे सावट पसरले आहे.

फिर्यादी दिलीप संजय मिसाळ (वय ३९, ग्रामपंचायत अधिकारी, रा. खेटाकळी, ता. शेवगाव) यांना आरोपी अमोल चंद्रकांत गवळी (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) यांनी अडवले. यावेळी अमोल गवळीने कमरेतली बंदूक काढत, “ऐ ग्रामसेवक… माझ्याकडे बंदूक आहे. यातील सहा गोळ्या तुझ्या छातीत घालीन,” अशी दहशतवादी धमकी दिली. इतकेच नव्हे, तर “तू आमच्या विरोधकांचे ऐकून काम केलेस. आता आमचे नेते खासदार झाले आहेत, आम्ही तुला आणि विरोधकांना जिरवूनच सोडू,” अशा उघड शब्दांत दबाव टाकला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे करीत आहेत.

या घटनेनंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण असून, “ग्रामसेवकावरच जर अशी जीवघेणी वेळ आली, तर सामान्य नागरिकांचे रक्षण कोण करणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!