पाथर्डी │ ग्रामीण भागातील मातांसाठी नैसर्गिक प्रसूतीची संस्कृती घडविणारे आणि तब्बल ५० हजारांहून अधिक महिलांना सुरक्षित मातृत्वाचा आधार देणारे आरोग्य माता रुग्णालय व ज्योती भवन यंदा २५ वर्षे पूर्ण करत आहे.

या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी रौप्य महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी नाशिक धर्मप्रांताचे महागुरू बिशप बार्थोल बरेटो, आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संस्थेच्या माध्यमातून अनाथ-मुलींसाठी वसतिगृह, स्वयंरोजगार प्रशिक्षण, पर्यावरण-जागरूकता, महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, पथनाट्ये, शिक्षण व सामाजिक उपक्रम राबवले जात असून, गेल्या दोन दशकांपासून ग्रामीण भागात समाजपरिवर्तनाची चळवळ सुरू आहे.

स्व. डॉ. अगस्ती करकरिया यांचे योगदान विशेष अधोरेखित करण्यात आले असून, त्यांच्या सेवेमुळेच ही संस्था “जीवनाला नवी दिशा देणारे केंद्र” म्हणून ओळखली जाते.
👉 रौप्य महोत्सव हा केवळ २५ वर्षांच्या कार्याचा गौरव नसून, ग्रामीण आरोग्यसेवेच्या नव्या प्रेरणादायी टप्प्याचा प्रारंभ ठरणार आहे.
