February 21, 2026

पाथर्डी प्रतिनिधी :
पाथर्डी तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर येत्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे आगमन अपेक्षित असून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी थेट गडावर जाऊन पाहणी करून प्रशासनाला ठोस सूचना दिल्या.या कालावधीत रस्ते, पाणी, वीजपुरवठा आणि दळणवळण या मूलभूत सुविधांची काटेकोर तयारी व्हावी, तसेच मोहटादेवी गडाभोवतीची अतिक्रमणे त्वरित हटवून घाट रस्त्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यात्रेपूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत स्थानिक प्रशासनाच्या सर्व विभागांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी मोहटा देवस्थान समितीच्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, जलप्रक्रिया प्रकल्प आणि स्वच्छतेच्या उपक्रमांची तपासणी करून संबंधितांना योग्य ती सूचना केली.जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मोहटादेवी गडावर दाखल झालेल्या पंकज आशिया यांनी देवीची महापूजा करून भाविकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. देवस्थान समितीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे आणि विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख यांनी त्यांचे स्वागत करून यात्रेसंबंधी सविस्तर माहिती दिली.बैठकीदरम्यान वारंवार समोर येणाऱ्या अडचणींवरही चर्चा झाली. अनेक वर्षांपासून दूरध्वनी यंत्रणा दुरुस्त न झाल्यामुळे नेटवर्क विस्कळीत राहते, ही मोठी समस्या असल्याचे निदर्शनास आणले. तसेच वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष उपाययोजना कराव्यात, असा स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. नवरात्र काळात वाढलेल्या मागणीमुळे वीजपुरवठा खंडित होऊन भाविकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले.मोहटा देवी घाट रस्त्याचे काम निश्चित मुदतीत पूर्ण करून भाविकांच्या सोयीसाठी वाहतुकीची योग्य व्यवस्था करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यात्रेदरम्यान पायी चालत येणाऱ्या भाविकांची आणि वाहनांची मोठी गर्दी लक्षात घेता पाथर्डी शहरासह गडाच्या परिसरातील अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळे करणे आणि भाविककेंद्रित नियोजनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

याचबरोबर, तनपुरवडी फाटा ते आयटीआय कॉलेजपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन काम तातडीने पूर्ण करावे, असेही निर्देश दिले गेले. यात्रेच्या काळात खराब रस्त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आदेश दिले.नवरात्र महोत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.या बैठकीत तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल कांबळे, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!