पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढा खवळला आणि त्याच लाटेत तिनखडी गावचे जेष्ठ नागरिक पांडुरंग निवृत्ती आंधळे (वय ७२) दुचाकीसकट वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. डोळ्यादेखत घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून तिनखडीसह धायतडकवाडी शोकसागरात बुडाला आहे.

कामानिमित्त पाथर्डीत आलेले आंधळे संध्याकाळी दुचाकीवरून परतत असताना अचानक आलेल्या पुराच्या लाटेत सापडले. स्थानिकांनी घटनास्थळावरून पाहिले तरी क्षणार्धात त्यांचा पत्ता लागेनासा झाला. तत्काळ तहसीलदार उद्धव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी व महसूल पथक दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली, मात्र पावसाचा जोर आणि अंधारामुळे अडथळे आले.
दरवर्षी या ओढ्याला पूर येत असूनही सुरक्षित पूल किंवा पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आहे. “आपत्कालीन मदत पुरवली जाते पण कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत,” असा आरोप स्थानिकांनी केला.
पांडुरंग आंधळे हे शांत, सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. नागरिकांचा ठाम सूर आहे की धोकादायक ओढ्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने केल्या नाहीत तर अशा दुर्घटना पुन्हा घडत राहतील.
