पाथर्डी नाथ सांप्रदायाचे आद्य चैतन्य मच्छिंद्रनाथांचा प्रकट दिन श्रीक्षेत्र मायंबा येथे राज्यातील विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणामध्ये व सांप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. मायंबा येथे चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असून तेथे ऋषिपंचमीनिमित्त नाथांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के ,अशोक महाराज मरकड, नवनाथ म्हस्के आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यासाठी नाशिक, पुणे, कल्याण, पनवेल, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, सातारा, जालना या भागातून भाविकांची विशेष गर्दी होती. मिरवणुकीमध्ये नाशिक येथील घोड्यांनी लक्षवेधी व अत्यंत उत्साहवर्धक असे नृत्य करत आसमान झेप घेत नाथांच्या समाधीला मुजरा केला. या घोड्यांच्या नृत्याने उपस्थित यांची मने जिंकली. श्रद्धाळू भाविकांनी घोड्यांच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी केली. मायंबा पासून जवळच श्रीक्षेत्र वृद्धेश्वर नाथ संप्रदायाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नऊ नाथांना नवनारायणाचा अवतार समजला जातो. म्हणून नाथसांप्रदायांमध्ये शिव व विष्णू या दोन्हींचाही भक्तीयोग दिसून येतो. आदिनाथ म्हणजे वृद्धेश्वराच्या आदेशाने मच्छिंद्रनाथांनी तेथून जवळच असलेल्या मायंबा येथील गर्भगिरी पर्वतरांगेच्या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. गेल्या काही वर्षांमध्ये पंढरपूरच्या आषाढी वारी नंतर सर्वाधिक भाविकांची वर्दळ असलेला तीर्थक्षेत्राचा भाग म्हणून मढी वृद्धेश्वर मायंबा या स्थानांची महती वाढत आहे. दर अमावस्येला सुमारे चार ते पाच लाख भाविक राज्याच्या विविध भागातून मायंबा येथे येतात. अत्यंत जागृत व साधकांना साधने प्रमाणे प्रचिती देणारे स्थान म्हणून मायंबाची ख्याती आहे. नाथ संप्रदायामध्ये महाप्रसाद सेवेला खूप महत्त्व असल्याने अनेक गावांच्या भाविकांकडून अथवा मंडळांकडून येणाऱ्या भाविकांसाठी मोफत महाप्रसाद सेवा उपलब्ध करून दिली जाते. गुढीपाडवा, पौष अमावस्या, या वेळी तर मायंबा येथे परिसरातील दहा किलोमीटर मध्ये सर्वत्र यात्रे करूच असतात. राज्य शासन व देवस्थान समितीच्या निधीतून मंदिर व परिसराचा कोट्यवधी रुपये खर्चून विकास आराखडा अमलात येत असून येत्या पाच वर्षांमध्ये मायंबाचे स्थान बीड व नगर जिल्ह्यात सर्वाधिक भाविकांची गर्दी असणारे स्थान म्हणून ओळखले जाईल. पहाटे विविध संत व साधकां सह देवस्थान समितीचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत संजीवन समाधी व नाथांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. संजीवन समाधी मंदिराचा गाभारा, मुख्य मंदिर सर्व ठिकाणी विविध रंगाची आकर्षक फुले व फुग्यांनी वैशिष्ट्यपूर्ण सजावट सुद्धा लक्षवेधी ठरली. सूर्योदयाच्या वेळी नवनाथ ग्रंथातील नाथांचा प्रकट होण्याच्या अध्यायाचे वाचन केले. अशोक मरकड महाराज व दादासाहेब चितळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन भजनी मंडळाच्या स्थानिक महिलांनी मच्छिंद्रनाथांचा जन्माचा पाळणा गायला. त्यानंतर नाथांच्या अश्वाची मंदिर आवारातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. नाथांचा जयजयकार, लोबान म्हणजे उद याचा सर्वत्र पसरलेला सुगंधी धूर, समाधानकारक पावसामुळे संपूर्ण हिरवाईने नटलेला परिसर व नाथपंथी वाद्यांचा पारंपारिक पद्धतीने चालू असलेला गजर पुणे मुंबई सह अन्य भाविकांकडून करण्यात आलेली फटाक्यांची आकर्षक अतिशबाजी, यामुळे वातावरण अगदी भारावून गेले. भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नाथ संप्रदायामध्ये सर्व नाथांनी अवतार घेतलेले आहेत. म्हणून त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. नाथ संप्रदायाचीच विस्तारित शाखा म्हणजे आजचा वारकरी संप्रदाय असून दोन्ही सांप्रदायाचे उपासक मढी वृद्धेश्वर मायंबा येथे वर्षभर दर्शनासाठी येतात. वृद्धेश्वर येथे तर नाथांची अत्यंत आकर्षक अशी धुनी व अष्टमहासिद्धीचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. तसेच स्थान श्रीक्षेत्र मायंबा येथे धोंडाई माता व सटवाईदरा म्हणून असून या स्थानांनाही अत्यंत चमत्कारिक स्थान म्हणून संबोधले जाते. नगर व बीड जिल्ह्याची हद्द याच गर्भगिरी डोंगरामुळे विभागली गेली आहे. देवस्थान समिती, शेंडगेवाडी व सावरगाव चे ग्रामस्थांनी उत्सवाचे अत्यंत चांगले नियोजन केले. सर्व विश्वस्त व कर्मचारी यांनी भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या मढी मायंबा असा घाट रस्ता दुपदरी व्हावा, यासाठी मढी मायंबा व वृद्धेश्वर देवस्थान समित्यांनी संयुक्त प्रयत्न करावेत. मढी घाटशिरस हा रस्ता अत्यंत खराब झाला असून राज्यातून आलेल्या भाविकांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. याकडे भाविकांनी लक्ष वेधले.
