February 18, 2026
WhatsApp Image 2025-08-25 at 11.45.39_c85acb62

पाथर्डी – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी ठाम भूमिका घेत प्रशासनासमोर स्पष्ट इशारा दिला. “डीजे वाजवायला परवानगी द्या अथवा नका देऊ, पण आम्ही मात्र डीजे वाजवणारच. हवे तर आजच आम्हाला आत टाका. आवाज मोजण्यासाठी मशीन आणले आहे, तुम्ही तपासा,” असे ते संतप्त स्वरात म्हणाले. त्यांच्या वक्तव्यामुळे क्षणभर तणाव निर्माण झाला.

बैठकीत गणेशोत्सवाच्या विविध तयारींचा आढावा घेण्यात आला, मात्र डीजेच्या मुद्द्यावर सर्वाधिक वाद रंगला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मंडळ कार्यकर्त्यांना आणि राजकीय नेत्यांना डीजेला परवानगी मिळावी अशी अपेक्षा असल्याचे स्पष्ट दिसून आले. प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी ठाम भूमिकेतून त्याकडे दुर्लक्ष केले.

पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत सांगितले, “डीजे वाजवण्याला परवानगी नाही म्हणजे नाहीच. कायद्याच्या कक्षेत आल्यावर कोणालाही सोडले जाणार नाही. पारंपरिक वाद्य वाजवा, पण डीजे आढळल्यास थेट जप्त केला जाईल. दहा दिवस नाही जमले तरी अकराव्या दिवशी कारवाई अटळ राहील.” त्यांच्या इशाऱ्यामुळे डीजेवाले व मंडळ कार्यकर्त्यांवर मोठा धाक बसल्याचे जाणवले.

या बैठकीत खंडित वीजपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, सार्वजनिक शौचालयांची गैरसोय, मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळे आणि पथदिव्यांचा अभाव यावरही चर्चा झाली. पालिका अभियंता विशाल मडवई यांनी लवकरच पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने उपस्थितांकडून नाराजी व्यक्त झाली.

जुन्या बसस्थानकावरील शौचालयाचा प्रश्नही ऐरणीवर आला. आमदार मोनिका राजळे यांनी गणेश मंडळांना उत्सवाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले. “स्वच्छता अबाधित ठेवा, आदर्श मंडळांचा गौरव केला जाईल. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,” असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी पालिकेला फिरत्या शौचालयांची सोय करण्याचे निर्देश दिले आणि पाथर्डी आगारातील बसेस कोकणात गेल्या तरी तालुक्यातील गणेशोत्सवात अडथळा येणार नाही याची खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत तहसीलदार उद्धव नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, गटविकास अधिकारी संगीता गर्जे, वीज वितरण कंपनीचे मयूर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी प्रास्ताविक केले, तर निरीक्षक पुजारी यांनी आभार मानले.

अखेरच्या क्षणापर्यंत डीजे वाजवण्याचा मुद्दाच केंद्रस्थानी राहिला. एका बाजूला मंडळ कार्यकर्ते व राजकीय नेते तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा ठाम इशारा – त्यामुळे पाथर्डीतील आगामी गणेशोत्सवात नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!