उपसंपादक सतिश मिरपगार
पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे ट्रॅव्हल्सवर झालेल्या थरारक दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला अखेर पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, दहशत माजवणाऱ्या टोळीला मोठा हादरा बसला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून यापूर्वी केलेल्या आणखी चार जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा झाला आहे.दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता त्रिभुवनवाडी ते खांडगाव मार्गावर खांडगाव परिसरात पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आडवी लावून पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी ट्रॅव्हल्समध्ये जबरदस्तीने प्रवेश केला होता. गावठी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या थरारक प्रकारात प्रवाशांकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून आरोपी फरार झाले होते.या घटनेप्रकरणी फिर्यादी पवन सुखदेव खैरनार (वय ३६, रा. साईकृष्णा अपार्टमेंट, जेल रोड, नाशिक) यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१, ३१०(२) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र २ आरोपी फरार होते. त्यापैकी एक आरोपी आकाश उर्फ गुल्या अनिल वांढेकर (वय २३, रा. मोहज खुर्द, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याचा शोध पोलीस घेत होते.दरम्यान, तपास सुरू असताना ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी कासार पिंपळगाव शिवारात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने हनुमान टाकळी ते जवखेड मार्गावर सापळा रचून संशयितावर नजर ठेवली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत आरोपीने खांडगाव दरोडा प्रकरणातील सहभागाची कबुली दिली. तसेच यापूर्वी केलेल्या ४ अन्य जबरी चोरीच्या गुन्ह्यांची माहितीही उघडकीस आली असून, त्या प्रकरणांचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा मोठा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु (शेवगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विलास पुजारी, सफौ. नितीन दराडे, पोहेकॉ. बाबासाहेब बडे, पोको. ज्ञानेश्वर इलग, पोको. संजय जाधव, पोको. सागर बुधवंत, पोको. रविंद्र चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली.
