उपसंपादक सतीश मिरपगार
कोपरगाव तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यक अंजली पवार यांना तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ अटक केली.

या कारवाईमुळे संपूर्ण तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली असून महसूल प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.तक्रारदाराकडील प्रलंबित काम करून देण्यासाठी संबंधित सहाय्यकाने लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची गोपनीय पद्धतीने पडताळणी केल्यानंतर आज नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला. ठरलेल्या ठिकाणी लाच स्वीकारताच एसीबी पथकाने तात्काळ कारवाई करत अंजली पवार यांना ताब्यात घेतले.या घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ‘सामान्य नागरिकांची कामे करून देण्यासाठी लाच मागितली जात असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.सध्या आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अहिल्यानगर एसीबी पथकाकडून केला जात आहे. प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा एसीबीकडून देण्यात आला आहे.
