February 19, 2026

पाथर्डी – दिवाळी सणानिमित्त पूरग्रस्त आणि गरजू नागरिकांना फराळ व शिधावाटप कार्यक्रमांमधून मदतीचा ओघ सुरू झाला असतानाच, या उपक्रमाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी इच्छुकांची संपर्क मोहीम जोरात सुरू झाली आहे.

शहरातील काही लाभार्थ्यांना तर एकापेक्षा जास्त पार्सले मिळाल्याचे दिसून आले आहे.गेल्या महिन्यातील अतिवृष्टीमुळे तालुक्याची मोठी हानी झाली. बाजारपेठेत मंदीचे सावट असून व्यापाऱ्यांचे व्यवहार कोमेजले आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत आजपासून खात्यावर वर्ग होऊ लागली असली, तरी बँक सुट्ट्यांमुळे पैसे काढणे शक्य नाही. केवळ डिजिटल व्यवहार समजणारे शेतकरीच ऑनलाइन रक्कम काढू शकतील. भाऊबीजेनंतर पैसे जमा झाल्यास बाजारपेठेत त्याचा परिणाम होईल का, याबाबत व्यापारी साशंक आहेत.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी अंगाला हळद लावून मतदारांशी संवाद सुरू केला आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने या निमित्ताने तोंड गोड करण्याची संधी इच्छुकांनी साधली आहे.रामभाऊ बंग मित्र मंडळ, जिल्हा चार्टर्ड अकाउंटंट संस्था, आमदार शिवाजीराव गरजे मित्र मंडळ, बंडू पाटील बोरुडे मित्र मंडळ, अभय आव्हाड मित्र मंडळ अशा विविध मंडळांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. डाळ, साखर, तेल, तांदूळ आणि आटा असा शिधा तर लाडू, चिवडा, शंकरपाळी, मोतीचूर लाडू, बर्फी अशा फराळाचे बॉक्स वाटप होत आहेत.दरवर्षी मदत देणारे हात वेगळे असतात; मात्र यंदा “मोठे हात छोट्या हातांकडे” धावत आहेत.

दिवाळीचा सण आणि मतदारांचा मूड या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळण्यासाठी इच्छुकांनी तोंड गोड मोहिमेचा नवा ट्रेंड आणला आहे. कार्यकर्त्यांना “दिवाळी पॅकेज” वाटले जात आहे. काही उपनगरांमध्ये तर भाऊबीजेच्या निमित्ताने महिलांना भेटवस्तू देऊन ओवाळले जात आहे. काही उमेदवार तर हेच “राजकीय कारकीर्दीतील शेवटचे संधी पर्व” समजून सोशल मीडियावर लाईव्ह संपर्क मोहीम राबवत आहेत.ग्रामीण भागात पूरग्रस्तांकडे खरोखरच सण साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. काही गावांत पाहुण्या रावळ्यांनी सणासाठी सहकार्य केले, तर काही ठिकाणी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्याच्या गुरु आनंद फाउंडेशन व गौतमनिधी फाउंडेशन यांनी शिरोळ, चिचोंडी, सोमठाणे, कोरडगाव, औरंगपूर, कोळसांगवी या भागात शिधावाटप आणि फराळ वितरण केले आहे.मदत देताना महसूल विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत घेऊन पंचनामे झालेल्या याद्यांवरून गरजूंना मदत केली गेली. शहर हद्दीत मात्र नव्यानेच ‘गरजूंचा आवाज’ ऐकू लागलेले इच्छुक मदतीसाठी सरसावले आहेत. काहींनी तर मिठाईवाल्यांकडेच यादी देऊन पार्सल पाठवण्याची सोय केली आहे.

अशा मधाळ शब्दांनी मतदारांची मनधरणी सुरू आहे. काही मतदार मात्र थेट प्रत्युत्तर देतात, “पाच वर्षांनी पुन्हा भेट द्यायला विसरू नका!” अशा संवादांमुळे निवडणुकीचा रंग अधिकच गडद होत आहे.येणाऱ्या रविवारनंतर पालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे. ज्यांना उमेदवारी निश्चित आहे, त्यांनी संपर्क मोहीमेत झोकून दिले आहे. काहींनी विकासकामांसाठी स्वतःचा खर्च करून मतदारांचे लक्ष वेधले, तर काहींनी पालिका कर भरून पावत्या मतदारांच्या घरी पोहोचवल्या आहेत.“आज मतदारांचे तोंड गोड आहे, पण निवडणुकीपूर्वी ते कडू पडू नये याचीही तयारी” काही सराईत इच्छुकांनी केली आहे. “दिन दिन दिवाळी, मतदारांना ओवाळी, मगच मतदार कपाळी, बांधतील मतांच्या माळी…” या भावनेनेच इच्छुकांची धावपळ सुरू आहे.आचारसंहिता लागू नसल्याने सध्या पाथर्डीत अक्षरशः “दिवाळीच दिवाळी”चे वातावरण आहे. काहींनी तर फराळ वितरणाचे आगळेवेगळे नियोजन करून लोकसंपर्काला नव्या उंचीवर नेले आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!