February 21, 2026

शेवगाव – पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत देशी दारूची अवैध वाहतूक करणारा इसम रंगेहात पकडला आहे.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेवगाव शहरातून एक व्यक्ती चारचाकी वाहनातून देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार आहे.

ही माहिती मिळताच पो.नि. मुटकुळे यांनी तातडीने तपास पथक तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शेवगाव येथे सापळा लावण्याचे आदेश दिले. पोलिसांनी दक्षता बाळगत सापळा लावला असता, एक स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH-12 JY 4759) गाडी वेगाने येताना दिसली. पोलिसांनी गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, गाडीचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परता दाखवत क्रांती चौक येथे पाठलाग करून वाहन थांबवले.

गाडीतील इसमास विचारपूस केली असता त्याने आपले नाव अजय श्रीधर पातकळ (रा. चापडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे दारू विक्रीचा परवाना असल्याबाबत चौकशी केली असता, कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

तपासादरम्यान गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला —

भिंगरी संत्रा कंपनीची देशी दारू — १६ सिलबंद बॉक्स, प्रत्येकी ३,५०० रुपये किंमतीचे; एकूण किंमत ₹५६,०००/-

स्विफ्ट डिझायर कार (MH-12 JY 4759) — अंदाजे किंमत ₹३,५०,०००/-

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹४,०६,०००/- एवढी आहे.

ही कारवाई पो.नि. संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव सानप, पोहेकॉ आबासाहेब गोरे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ भगवान सानप, पोकॉ राहुल आठरे, व पोकॉ आदिनाथ शीरसाठ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ आबासाहेब गोरे करत असून शेवगाव पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!