प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी – कल्याण–विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक ठिकाणी सदोष पद्धतीने झाले असून चुकीच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात कसुरी अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवावा, असे आदेश अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती दिली.

पालकमंत्री विखे यांनी आज पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टी बाधित भागाची पाहणी केली व मोहटादेवी येथे पूरस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे, बांधकाम, महसूल, कृषी आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्गे, प्रांताधिकारी प्रसाद मते आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर विखे यांनी मोहटादेवी गडावर महापूजा करून आशिर्वाद घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, निवडुंगे, माळी बाभळगाव, कारेगावसह अनेक गावांतील नागरिकांनी पूरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत तातडीने मदत व निधी मिळावा अशी मागणी केली.
पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री विखे म्हणाले की, “अहिल्यानगर ते मिडसांगवी जिल्हा हद्दीपर्यंत महामार्गावर खड्डे, अर्धवट पूल, अपूर्ण गटार व निकृष्ट दर्जामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.” या निकृष्ट कामांमुळे पूल खचले, रस्ते वाहून गेले आणि नागरिकांचे हाल झाले. त्यांनी स्पष्ट केले की, मागील पन्नास वर्षांत झाला नाही इतका पाऊस यावर्षी झाला असून नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तातडीची मदत मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे.
विखे यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, “कोणता बंधारा फुटला, कोणता रस्ता कोसळला यावर चर्चा न करता नागरिकांना तातडीने मदत द्या. लोकांच्या मनातील भीती दूर करणे गरजेचे आहे.” तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष ठेवून सतर्क राहण्याचे आदेशही दिले.
प्राथमिक अंदाजानुसार पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, खरड जमिनीसाठी तलावातील माती शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासनही विखे यांनी दिले.
