प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नाणी नदीवरील पूल वाहून गेला असून दहा ते पंधरा गावांचा संपर्क गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे तुटलेला आहे. आठ-दहा दिवसांपासून वीजपुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल अक्षरशः भीषण झाले आहेत. दळण-दाण्यासाठीही गावकऱ्यांना शेजारील गावांमध्ये जावे लागत आहे.

वारंवार मागणी करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही, याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कोरडगावचे सरपंच रविंद्र म्हस्के, औरंगपूरचे सरपंच दादासाहेब किलबिले, उपसरपंच प्रताप देशमुख यांच्यासह परिसरातील अनेक पदाधिकारी तुटलेल्या पुलावर जमले आणि शासनाविरोधात भावना व्यक्त केल्या. “मंत्री, आमदार, अधिकारी तालुक्याच्या डांबरी रस्त्यावरील गावांत भेट देऊन गेले, मात्र आम्ही मरत असताना आमच्याकडे लक्ष द्यायला कोणीही आले नाही,” अशा शब्दांत ग्रामस्थांचा संताप ओसंडून वाहत होता.
पूरामुळे शाळा कागदोपत्री सुरू असल्या तरी प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थित राहू शकत नाहीत. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत. विजेच्या अभावामुळे ग्रामस्थ दिवसेंदिवस हाल सोसत आहेत. शासनाकडे निधी नसेल तर “आम्ही लोकवर्गणीतून पूल करू”, पण त्यानंतर जनतेचा आक्रोश नियंत्रणाबाहेर जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

“खरी हानी तालुक्याच्या पूर्व भागात झाली आहे, मात्र येथे कोणीही लक्ष देत नाही. आम्ही भारतात राहतो की भारताबाहेर ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आमच्यावर आली आहे. फोटो काढून प्रसिद्धी करण्यापेक्षा आम्हाला दोन घास अन्न-पाणी द्या, अन्यथा उपासमारीने मृत्यू ओढवेल,” असे कोरडगावच्या ग्रामस्थांनी सांगितले.
