प्रतिनिधी – सुरेश शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमठाणे, सुसरे, आखेगाव, वरुड बुद्रुक, वडुले, जोरापूर, खामगाव, बोधेगाव, गोळेगाव यांसह अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाऊन उध्वस्त झाली आहेत.शेवगाव शहराने तर अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले आहे. पावसामुळे रस्ते बंद पडले असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या कठीण परिस्थितीत स्थानिक नेते व सर्वपक्षीय कार्यकर्ते वाहतुकीस मदत करत होते.

शेवगावचे भाजप नेते अरुण मुंडे यांनी पावसग्रस्त भागाची पाहणी करून गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी प्रशासनास तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आवाहन केले. मुंडे म्हणाले, “शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी.”
या पाहणी दौऱ्यात स्थानिक नेते अरुण पाटील लांडे, मराठा संघाचे दीपक भाऊ शेंडे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गावागावात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिक व शेतकरी मोठ्या चिंतेत असून, सर्वांचे लक्ष आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.
