प्रतिनिधी – सचिन दिनकर
पाथर्डी तालुक्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुका हादरवून टाकला आहे. पहाटेपर्यंत कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद पडले आहेत, तर नदी-नाल्यांमध्ये अचानक पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. गावोगावी पाण्याचा महापूर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे सकाळपासून वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडणे कठीण झाले असून तहसील प्रशासनाने तातडीने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी सुरक्षित राहावे आणि अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.घटस्थापनेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक मोहटादेवीच्या दर्शनासाठी निघाले असताना पावसामुळे त्यांना मोठा अडथळा निर्माण झाला.

कारेगाव येथील नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे तुटल्याने पाथर्डी-कारेगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. भाविकांना रस्त्याच्या कडेला बसून पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करताना पाहायला मिळाले. देवस्थान समितीकडून सुरक्षिततेसाठी दर्शनासाठी येणाऱ्यांना हट्ट न धरता घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसामुळे कारेगाव येथील तुकाराम रामनाथ दहिफळे यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले, तर शंकर शेकडे आणि शंकर भाबड यांच्या पशुधनाचा पाणी वाहून गेला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे गावोगावच्या संपर्क रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
स्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सतत लक्ष ठेवत आहे. पोलिस पावसाळी भागात सतर्क आहेत, तर स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान कर्मचारी सकाळपासून मदत व बचाव कार्यात सक्रिय आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.
