प्रतिनिधी – सचिन दिनकर
अहिल्यानगर, दि. २२ – भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, वेगवान वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘यलो अलर्ट’ जाहीर करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढत असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. सध्या भिमा नदीवरील दौंड पूल येथे १०,१९८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधाऱ्यातून ४,२९९ क्युसेक, मुळा धरणातून ५,००० क्युसेक, घोड धरणातून ३,००० क्युसेक, सीना धरणातून ११,५६० क्युसेक, कुकडी नदीवरील येडगाव धरणातून ३०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,६०० क्युसेक आणि खैरी धरणातून ९,६१३ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
वादळी हवामानात मेघगर्जना किंवा विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली अथवा झाडांच्या जवळ उभे राहणे टाळावे. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांचा प्रहार चालू असताना कोणत्याही प्रकारच्या विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीज वाहक वस्तूंना स्पर्श करू नये, तसेच ट्रॅक्टर, शेतीतील अवजारे, मोटारसायकल किंवा सायकलपासून दूर रहावे. मोकळ्या मैदानात, टॉवर, ध्वजांचे खांब, विद्युत किंवा दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. लोंबणाऱ्या केबल्सपासून अंतर ठेवावे. जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याजवळ उभे राहू नये.
विजा चमकत असताना मोकळ्या जागेत अडकल्यास जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवून गुडघ्यावर बसावे, कान हाताने झाकावेत आणि डोके गुडघ्यांच्या मध्ये सुरक्षित करावे. धरण परिसरात किंवा नदीच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचे टाळावे. नदी, ओढे किंवा नाल्यांच्या काठावरील रहिवाशांनी सतत दक्ष राहून पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नद्या किंवा ओढ्यांवरील पुल आणि बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्यास त्यावरून जाण्याचा प्रयत्न करू नये.
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असून आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेवर सुरक्षित जागी स्थलांतर करावे. मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक इमारतीत आश्रय घेऊ नये. मुसळधार पावसामुळे भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याचा धोका असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी. घाट रस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा आणि जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवावे.
आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० नागरिकांसाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
