प्रतिनिधी _सचिन दिनकर
पाथर्डी : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीने शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली, जनावरे दगावली, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून शासनाने कुणावरही अन्याय न करता सर्वांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केली आहे.
प्रा. चव्हाण म्हणाले की, आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी बाधित गावांना भेटी दिल्या, पाहणी केली; मात्र हे फक्त औपचारिकतेपुरते न राहता शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष मदत पोहोचली पाहिजे. “पाहणीची नौटंकी न करता तातडीने निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या,” असे आवाहन त्यांनी शासनाला केले.
काही वर्षांपूर्वी अशाच संकटाच्या वेळी वर्ग दोन व उताऱ्यावर पोटखराबा नोंदी असलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, असेही प्रा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या मागणीसाठी प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गीते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष योगेश साठे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, अमोल मिरपगार, योगेश गुंजाळ, नागेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
