क-हे टाकळी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज क-हे टाकळी या गावात एक दु:खद घटना घडली.

गावातील वृद्ध महिला कांथाबाई मार्कस पटेकर (वय ७५) यांचा घराची भिंत अचानक कोसळून दबल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाव शोकाकूल झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. मात्र, त्याआधीच भिंतीखाली दबून त्यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. “अशी घटना आमच्या गावात घडेल असे वाटले नव्हते,” अशी हळहळ व्यक्त करत ग्रामस्थांनी पीडित कुटुंबाला मदतीसाठी पुढे येण्याचा निर्धार व्यक्त केला.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक व अन्य मदतीची मागणी केली असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी दुर्लक्षित घरांची तपासणी व सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे क-हे टाकळी गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून, पावसामुळे जीवितहानी होण्याच्या घटनांकडे वेळेवर लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
