February 19, 2026

गुरुप्रसाद गृहनिर्माण संस्थेची निवडणूक बिनविरोध (दोन पासपोर्ट, धस, क्षीरसागर)
आ. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर गटाचे वर्चस्व
शिरूरकासार दि.७ (प्रतिनिधी): गुरुप्रसाद गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, वारणीची निवडणूक (दि.५) सप्टेंबर शुक्रवार रोजी बिनविरोध पार पडली. संस्थेतील सर्व १३ जागांवर आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

संस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यापैकी १५ उमेदवारांनी दुपारी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, उर्वरित १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी जी. बी. वेडे यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली, तर प्रशासक पी. आर. आगे यांनी निवडणुकीसंबंधी कामकाजाची जबाबदारी सांभाळली. १९८९ मध्ये स्थापन झालेली गुरुप्रसाद गृहनिर्माण संस्था काही वर्षांपासून संचालक मंडळाच्या अभावी प्रशासकांच्या अखत्यारीत होती. अनेक सभासदांना प्लॉट वाटपात अनियमिततेमुळे त्रास सहन करावा लागत होता. काही सभासदांना भूखंड न मिळाल्याने असंतोष पसरला होता. अखेर सभासदांच्या मागणीवरून निवडणूक जाहीर करण्यात आली आणि अनामत रक्कम भरल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली.

संस्थेच्या निवडणुकीत जागांचे आरक्षण सर्वसाधारण गट ८ जागा, महिला राखीव २ जागा, अनुसूचित जाती-जमाती १ जागा, भटक्या-विमुक्त जाती-जमाती १ जागा व इतर मागास प्रवर्ग १ जागा. या सर्व जागांवर धस–क्षीरसागर गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडून आलेल्या संचालक मंडळाची पहिली सर्वसाधारण सभा येत्या १४ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदांची निवड केली जाणार आहे. या नव्या संचालक मंडळाकडून संस्थेच्या जुन्या तक्रारींचे निराकरण होईल, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली आहे.


चुकीचे वाटप रद्द; नवे लेआऊट
पूर्वी चुकीच्या भुखंड वाटपामुळे अनेक सभासदांना भुखंड न मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता नवीन सभासद आणि काही जुन्या सभासदांच्या स्वखुशीने त्यांचे भुखंड रद्द करून नवे लेआऊट तयार करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक सभासदाला नियमाप्रमाणे भुखंड मिळेल आणि एकही सदस्य वंचित राहणार नाही.
-प्रकाश देसरडा, नवनिर्वाचित सभासद गुरुप्रसाद गृहनिर्माण सहकारी संस्था

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!